साखरभात
साहित्य : 2 वाट्या बारीक तांदूळ, अडीच वाट्या साखर, 2 मोठे चमचे साजूक तूप, 5 लवंगा, 1 चमचा वेलदोड्यांची पूड, 5 केशराच्या काड्या, 5 बदाम, 15 बेदाणे, चवीनुसार मीठ, केशरी रंग (हवा असल्यास), 4 वेलच्यांचे दाणे.
कृती : साखरभात बनविण्याच्या साधारण दोन तास आधी तांदूळ धुऊन ठेवा. बदाम भिजत घालून, त्याची साले काढून, पातळ काप करा. एक ताटली तापवून त्यावर केशर काड्या घाला. नंतर या काड्या चुरून चमचाभर दुधात घालून ठेवा. केशरी रंग पाण्यात घालून ठेवा. पातेल्यात तूप गरम करून त्यात लवंगा घाला. नंतर वेलदोड्यांचे दाणे घालून थोडे परतवून घ्या. त्यावर धुऊन ठेवलेले तांदूळ घालून, तेही थोडे परतवून घ्या. नंतर त्यात गरम पाणी घालून भात मऊसर मोकळा शिजवून घ्या. भात आचेवरून खाली उतरवून, गरम असतानाच त्यात साखर एकत्र करा आणि थोडा वेळाने भात पुन्हा आचेवर ठेवा. साखर विरघळल्यामुळे भात थोडा पातळ होईल. त्यात केशराचे दूध, केशरी रंग, वेलची पूड, बदामाचे काप व बेदाणे घालून एकत्र करून घ्या. थोड्या वेळाने भात पुन्हा आटून मऊ व मोकळा होईल. तेव्हा त्यात बाजूने साजूक तूप सोडून झाकण लावा व आच बंद करा.