टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिॲलिटी शोपैकी एक असलेल्या 'बिग बॉस २ चा विजेता शिव ठाकरेबद्दल एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. शिव ठाकरे आणि हिंदी बिग बॉसमधली सर्वांचा आवडते स्पर्धक अब्दू रोजिक यांनाही अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. एका हाय-प्रोफाईल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात साक्ष देण्यासाठी त्याला बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण कथित ड्रग माफिया अली असगर शिराझीशी संबंधित आहे. वृत्तानुसार, या प्रकरणात साक्षीदार म्हणून दोघांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.
बातम्यांनुसार, अली असगर शिराझी हसलर्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी चालवत होता आणि ही कंपनी अनेक वेगवेगळ्या स्टार्ट-अप्सना वित्तपुरवठा करत होती. त्यात शिव ठाकरेंच्या 'ठाकरे टी अँड स्नॅक्स' या खाद्यपदार्थ आणि स्नॅक्स रेस्टॉरंटशिवाय, अब्दु रोजिकच्या फास्ट फूड स्टार्ट-अप 'बर्गर' ब्रँडचाही समावेश आहे.
कंपनीने नार्को फंडिंगद्वारे पैसे कमवले
अलीच्या या कंपनीने नार्को फंडिंगच्या माध्यमातून पैसा कमावल्याचे आरोप आहे. हे पैसे त्यांना हसलर्स हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमातून गुंतवणूक म्हणून देण्यात आले असून शिराझी यांनी स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे.
वृत्तात असेही आढळून आले आहे की, शिव आणि अब्दू यांना शिराजीचा नार्को व्यवसायात सहभाग असल्याची माहिती मिळताच दोघांनीही त्याच्यासोबतचा करार तात्काळ संपुष्टात आणला.