शिंगाड्याचा शिरा
साहित्य : 1 कप शिंगाड्याचं पीठ, 1 कप साखर, सव्वा कप तूप, 3 कप पाणी, 2 टीस्पून वेलची पूड, पाव कप काजूचे तुकडे.
कृती : एका पातेल्यामध्ये पाणी आणि साखर एकत्र गरम करत ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. साखर विरघळली की, आच मंद करा. आता दुसर्या आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात मध्यम आचेवर 1 कप तूप विरघळवून त्यात शिंगाड्याचं पीठ घाला आणि व्यवस्थित भाजून घ्या. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण थोडं जाडसर झालं की, आच मंद करून त्यात वेलची पूड घाला. आता त्यात हळूहळू साखरेचं पाणी एकत्र करा. मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत, याची काळजी घ्या. मध्यम आचेवर शिरा 10-15 मिनिटं सतत ढवळा. आता आच बंद करून पातेल्यावर झाकण लावून पाच मिनिटं शिरा तसाच राहू द्या. फोडणीच्या भांड्यात मध्यम आचेवर उर्वरित तूप गरम करून, त्यात काजूचे तुकडे सोनेरी रंगावर तळून घ्या. काजू तुपासोबत शिर्यावर घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.