उपवासाचे रताळ्याचे पराठे

साहित्य : सारणासाठी साहित्य : 2 उकडलेली रताळी (मध्यम आकाराची), एक वाटी किसलेले खोबरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टीस्पून भाजलेल्या जिर्याची पूड, अर्धी वाटी चिरलेली कोथींबीर, चवीनुसार मीठ, एका लिंबाचा रस.
कणकेसाठी साहित्य : 1 वाटी शिंगाडयाचे पीठ, अर्धी वाटी राजगीर्याचं पीठ, चवीनुसार मीठ, आवश्यकतेनुसार कणीक भिजवायला पाणी.
कृती : वर दिलेले साहित्य एकत्र करून पराठ्याच्या वरच्या आवरणासाठी राजगीरा व शिंगाडा पीठ एकत्र करून कणिक मळून घ्या. उकडलेले रताळे किसून सारणाचे इतर साहित्य टाकून व्यवस्थित एकत्र करा. आता कणकेचे गोळे करून पराठ्यासाठी सारण भरतो त्याप्रमाणे रताळ्याचे सारण भरून पराठे करा. हे पराठे तुपावर शेका व दही किंवा चटणीसोबत खायला द्या.
टिप : नेहमीच्या कणकेसारखी ही कणिक मऊ नसते म्हणून सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्या. तसेच सारणाकरिता रताळ्याऐवजी बटाटा देखील वापरता येतो.
