दक्षिण भारतात टोमॅटोचं लोणचं अतिशय प्रसिद्ध आहे. गोड, आंबट, खारट, तिखट अशा विविध चवींचं मिश्रण असलेलं हे लोणचं बनवणं सोपं आहे.
साहित्य : 250 ग्रॅम टोमॅटो, 2 टेबलस्पून किंवा स्वादानुसार मीठअर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून व 1 टेबलस्पून मोहरी, पाव टीस्पून मेथीदाणे, पाव टीस्पून हिंग, 1 टेबलस्पून साखर, 1-2 टेबलस्पून लाल मिरची पूड (आवडीनुसार), पाव कप तेल.
कृती : 1 टेबलस्पून मोहरी आणि मेथीदाणे छान सुगंध येईपर्यंत कोरडेच भाजून घ्या. थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या. टोमॅटो स्वच्छ धुऊन पुसा आणि त्याचे लहान तुकडे करून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात सर्वप्रथम पाव टीस्पून मोहरी घाला. मोहरी तडतडू लागली की, त्यात हिंग घाला. आच मंद ठेवा. आता त्यात टोमॅटो, हळद, साखर आणि मीठ एकत्र करा. मंद आचेवर हे मिश्रण सतत ढवळत शिजवा. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र होऊन टोमॅटो अगदी नरम झाले आणि मिश्रणाच्या कडेला तेल सुटलं की आच बंद करा. यासाठी साधारण 15 मिनिटं लागतील.
आच बंद केल्यावर मिश्रण थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यावर त्यात मोहरी-मेथीदाणे पूड आणि लाल मिरची पूड व्यवस्थित एकत्र करा आणि हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ठेवा. हे टोमॅटोचं लोणचं साधारण 20 दिवस छान टिकतं. फ्रीजमध्ये ठेवल्यास 3 महिन्यांपर्यंतही टिकतं.
टोमॅटोचं लोणचं (Tomato Lonche)
Link Copied