सुक्या मेव्याचे मोदक
साहित्य : एक कप सुक्या खोबर्याचा कीस, अर्धा कप खसखस, 10-12 खारका, एक कप बदाम, अक्रोड आणि काजूचे तुकडे, एक कप दूध, दोन कप साखर, पिठीसाखर व तूप.
कृती : खसखस, खारीक, काजू व बदाम भिजत घाला. दोन तासांनी एकत्र वाटून घ्या. अक्रोड व सुक्या खोबर्याचा कीस साधारण गरम करून बारीक वाटून घ्या. या मिश्रणात वेलची-जायफळ पूड मिसळा आणि कढईत तूप टाकून परतून घ्या. परतताना मधेमधे दुधाचा हबका मारा. मिश्रण तूप सोडू लागले की, आच बंद करा. आता यात पिठीसाखर मिसळून एकजीव करून घ्या. मोदकाच्या साच्याला तूप लावून मोदक तयार करा. मोदकावर खोबर्याचा रंगीत कीस भुरभुरवा. मोदकाचा हा शाही प्रकार सर्वांना आवडणारा आहे.
ब्रेडचे मोदक
पारीसाठी साहित्य : जितके मोदक करायचे आहेत तितके ब्रेड.
सारणासाठी साहित्य : एका नारळाचा चव, दीड वाटी साखर, वेलची-जायफळ पूड, अर्धा चमचा रोझ इसेन्स, थोडेसे मनुके आणि मनुके चारोळी.
कृती : कढईत तूप गरम करून नारळाचा चव व साखर एकत्र परतून घ्या. यात वेलची पूड, रोझ इसेन्स, मनुके व बेदाणे घालून सारण तयार करा. ब्रेडच्या स्लाईसच्या कडा सुरीने काढून टाका. एकेक स्लाईस पाण्यात टाकून नंतर हाताने दाबून पाणी काढून टाका. तळहातावर ब्रेड पसरवून यात चमचाभर तयार सारण ठेवा. मोदकासारख्या चुण्या करीत ब्रेडचा मोदक बनवा. हे मोदक तुपात तळून घ्या. हे मोदक फार सुंदर लागतात. तसेच शाही टुकडा प्रमाणे ब्रेडपासून मोदकाचा हा वेगळा पदार्थ करता येईल.