फ्लॉवर मंच्युरियन
साहित्य : फ्लॉवरचे तुरे तळण्यासाठी ः 1 मध्यम आकाराचा फ्लॉवर, 1 कप मैदा, 4 टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, पाव टीस्पून काळी मिरी पूड, पाव टीस्पून ते अर्धा टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर,1 टीस्पून सोया सॉस, 1 कप पाणी (गरजेनुसार कमी जास्त करा.), 5-6 टेबलस्पून तेल तळण्यासाठी.
इतर साहित्य : पाऊण कप चिरलेली कांद्याची पात (पांढरा कांदा वापरायचा आणि हिरवी पात चिरून सजावटीसाठी वेगळी ठेवा.), अर्धा कप चिरलेली सिमला मिरची, 3 टीस्पून आलं बारीक केलेलं, 8 ते 10 लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धा टेबलस्पून सेलेरी चिरलेली (हवी असेल तर वापरा), दीड टेबलस्पून लाइट सोया सॉस (चवीनुसार वापरा), 1 टेबलस्पून टोमॅटो केचप, 1 टेबलस्पून व्हिनेगर (जे उपलब्ध असेल ते वापरा), पाव ते अर्धा चमचा काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ.
कृती : सर्वप्रथम फ्लॉवरचे मध्यम आकाराचे तुरे कापून घ्या. एका भांड्यामध्ये पाणी गरम करा. त्यात मीठ घाला. आता त्या पाण्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालून एक उकळी काढून घ्या. फ्लॉवरचे तुरे मऊ झाले की त्यातील पाणी काढून टाकून ते एका बाजूला ठेवा. आता एका भांड्यामध्ये बॅटरसाठी लागणारं मैदा, कॉर्नफ्लोअर, सोया सॉस, काळीमिरी पूड, काश्मिरी लाल मिरची पावडर आणि मीठ एकत्र करा. त्यात थोडं पाणी घालून व्यवस्थित मिसळा. त्यात पीठाची गुठळी राहता कामा नये. नंतर या बॅटरमध्ये फ्लॉवरचे तुरे बुडवून गरम तेलामध्ये डीप फ्राय करा किंवा पॅनमध्ये शॅलो फ्राय करा. परंतु फ्लॉवर सर्व बाजूंनी शेकले जाऊन सोनेरी रंगाचे झाले पाहिजेत. सर्व फ्लॉवर तळून झाल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून ठेवा.
ड्राय मंच्युरियन बनविण्यासाठी शॅलो फ्रायसाठी घेतलेल्या पॅनमध्येच तेल न घालता आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या घाला. नंतर त्यात चिरलेल्या पातीचा कांदा आणि सिमला मिरची घाला. सेलेरी घेतली असल्यास ती घाला. गॅस थोडा वाढवा आणि सर्व मिश्रण ढवळत राहा. सिमला मिरची अर्धवट शिजू द्या किंवा पूर्ण शिजवून घ्या. नंतर त्यात सोया सॉस, टोमॅटो केचप, काळी मिरीपूड आणि मीठ घाला. व्यवस्थित ढवळा. त्यात तळलेले फ्लॉवरचे तुरे घाला. तयार मसाला फ्लॉवरच्या प्रत्येक तुर्यांना व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिश्रण चांगले ढवळा. शेवटी व्हिनेगर घाला आणि ढवळा. नंतर गॅस बंद करा. चव पाहा. हवं असल्यास आपल्या आवडीनुसार सोया सॉस, टोमॅटो केचप घाला आणि गरमगरम खा.