कोकमाची फळं म्हणजे रातांबे. एप्रिल-मे महिन्यात कोकणामध्ये रातांबे भरपूर प्रमाणात येऊ लागतात. यांचा सरबतासाठी लागणारा आंबट-गोड पाक किंवा सिरप कसा बनवायचा, त्याविषयी-
कोकम पाक किंवा सिरप
साहित्य : 30 कोकमाची फळं (रातांबे), दीड कप साखर.
कृती : कोकमाची फळं धुऊन फडक्याने व्यवस्थित पुसून कोरडे करून घ्या. त्यांचे मधून दोन भाग करून, त्यातील पांढर्या रंगाचा गर काढा. आता या कोकमाच्या प्रत्येक वाटीमध्ये साखर भरा. स्वच्छ कोरडी काचेची बरणी घेऊन त्याच्या तळाशी थोडी साखर पसरवा. आता बरणीमध्ये एकावर एक अशा प्रकारे कोकमाच्या वाट्या ठेवा. वरून पुन्हा थोडी साखर घाला. बरणीच्या तोंडाला सुती कापड बांधून आठ ते दहा दिवस कडक उन्हामध्ये ठेवा. उन्हात बरणी ठेवण्यापूर्वी दररोज त्यातील मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या.
आठ-दहा दिवसांमध्ये छान घट्ट आणि गडद गुलाबी-लालसर रंगाचा पाक तयार होईल. आता त्यातून सालं घट्ट पिळून काढा आणि पाक गाळून घ्या. हा कोकमाचा पाक किंवा सिरप स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवा. व्यवस्थित काळजी घेतली तर हा पाक वर्षभरही छान टिकतो.