Close

मुगाचा ढोकळा (Moong Dhokla)

मुगाचा ढोकळा


साहित्य : 1 कप अख्खे हिरवे मूग, 1 टेबलस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, अर्धा कप पाणी वाटणाकरिता, 1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून तेल,
1 टेबलस्पून लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून बेकिंग सोडा किंवा इनो.

फोडणीसाठी : 1 ते 2 टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून राई, अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून पांढरे तीळ भाजून घेतलेले, चिमूटभर हिंग, कढिपत्ता, 2 टेबलस्पून पाणी.

सजावटीसाठी : पाव कप कोथिंबीर चिरलेली, पाव कप खोवलेले खोबरं.

कृती : बॅटर बनवण्यासाठी : अख्खे मूग स्वच्छ धुऊन पुरेसे पाणी घेऊन त्यात 6 ते 7 तास किंवा रात्रभर चांगले भिजवून ठेवा. सकाळी मुगातील पाणी काढून टाका. आता मिक्सरच्या भांड्यात ते मूग, कोथिंबीर आणि अर्धा कप पाणी घालून अर्धवट भरडल्यासारखं वाटून घ्या. एकदम बारीक वाटू नका. मिश्रण जास्त जाड वा अगदीच पातळही ठेवू नका. ढोकळ्यासाठी लागतं तसं मध्यम बॅटर बनवायचं.

ढोकळा बनविण्यासाठी : मिक्सर लावण्याच्या दरम्यान एका पातेल्यात 2 ते अडीच कप पाणी गरम करत ठेवा. हे पाणी चांगले उकळू द्या. एका पसरट गोल पॅनला तेल लावून घ्या. आता मुगाच्या बॅटरमध्ये हिरवी मिरची आणि आलं यांची पेस्ट, तेल, लिंबाचा रस आणि मीठ घालून चांगले ढवळा. सगळ्यात शेवटी सोडा किंवा इनो घाला आणि एकत्र करून लगेचच हे बॅटर तेल लावलेल्या पॅनमध्ये ओता. नीट पसरवा. नंतर पाणी गरम केलेल्या पातेल्यावर पॅन ठेवा. पॅनवर घट्ट झाकण ठेवा आणि 12-15 मिनिटं ढोकळा शिजू द्या. ढोकळा शिजला की पॅन खाली घ्या नि गॅस बंद करा.

फोडणीसाठी : एका लहान पॅनमध्ये तेल गरम होऊ द्या. त्यात राई घाला. ती तडतडली की त्यात जिरं घाला. ते तपकिरी झालं की त्यात हिंग, कढिपत्ता आणि परतून घेतलेले तीळ घाला. सर्व साहित्य चांगले परतून घ्या नि त्यात 2 टेबलस्पून पाणी घाला. ढवळा आणि उकळी येऊ द्या. पाणी घालताना सावकाश घाला. आता ही फोडणी तयार ढोकळ्यावर वरून घाला. तयार ढोकळा खोबरं आणि कोथिंबीरने सजवा. गरमागरम ढोकळा पुदिना चटणीसोबत सर्व्ह करा.

Share this article