Close

पंजाबी समोसा आणि समोसा मसाला चाट (Panjabi Samosa And Samosa Masala Chat)

पंजाबी समोसा
सारणासाठी साहित्य : 2 उकडलेले बटाटे, 1 कप वाटाणे, 1 टीस्पून आलं-मिरचीची पेस्ट, 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून गरम मसाला पावडर व आमचूर, 1 टेबलस्पून कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
पारीसाठी साहित्य : 2 कप मैदा, अर्धा कप गरम तेल, अर्धा टीस्पून ओवा, पीठ भिजवण्यासाठी कोमट पाणी, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : कढईत तेल गरम करून मोहरीची फोडणी द्या. मोहरी तडतडल्यानंतर मटार टाकून परतून घ्या. आलं-लसणाची पेस्ट व हळद टाकून थोडा वेळ परता. धणे पावडर, बडीशेप, गरम मसाला पावडर, आमचूर टाकून पुन्हा परतून घ्या. यात कापलेला बटाटा टाका. मीठ टाका. कापलेली कोथिंबीर टाकून भाजी एकजीव करा. आता मैद्यामध्ये मीठ, गरम तेल आणि ओवा टाकून पीठ मळून घ्या. याचे गोळे बनवून चपाती लाटा. चपातीचा अर्धवर्तुळाकार भाग कापून त्याला कोनाचा आकार द्या. यात सारण भरून पाण्याने कडा घट्ट बंद करा. गरम तेलात सोनेरी रंगावर समोसे तळून घ्या. हिरव्या चटणीसह पंजाबी समोसा सर्व्ह करा.

समोसा मसाला चाट
साहित्य : 2 समोसे, 2 कापलेले कांदे, अर्धा टीस्पून कापलेली हिरवी मिरची, 1 टेबलस्पून बारीक कापलेली कोथिंबीर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून काळे मीठ, 1 टीस्पून चाट मसाला, 1 टेबलस्पून धणे-जिरे पावडर, 2 टीस्पून दही, 1 टीस्पून चिंचेची चटणी, 1 टोमॅटो, अर्धा कप हिरवे वाटाणे, अर्धी वाटी काबुली चणे, 1 टीस्पून हळद, तेल, चवीनुसार मीठ.
कृती : वाटाणे आणि काबुली चणे रात्रभर भिजवून कुकरमध्ये शिजवून घ्या. शिजवताना यात थोडीशी हळद टाका. तव्यावर तेल गरम करून कांदा परतून घ्या. हिरवी मिरची, लाल मिरची पावडर आणि धणे-जिरे पावडर टाकून परतून घ्या. आता काबुली चणे आणि वाटाणे टाकून थोडासा रस्सा राहील इतपत शिजवून घ्या. चिंचेची चटणी आणि कोथिंबीर टाका. हे चाट प्लेटमध्ये टाकून यात समोशाचे प्रत्येकी चार तुकडे करून टाका. वरून कापलेला, टोमॅटो, चिंचेची चटणी, दही, चाट मसाला, काळे मीठ व कोथिंबीर टाका. बारीक शेव टाकून सजवा आणि चाट सर्व्ह करा.

Share this article