पुरणाचे कडबू
साहित्य : 1 वाटी चणा डाळ, सव्वा वाटी साखर, प्रत्येकी 1 टीस्पून वेलदोड्यांची व जायफळ पूड, आवडीनुसार सुका मेवा, दीड वाटी गव्हाचं पीठ, 4 टीस्पून मैदा, मोहनासाठी 3 टेबलस्पून तेल, तळण्यासाठी तूप.
कृती : चणा डाळ धुऊन कुकरमधून शिजवून घ्या. नंतर चाळणीवर उपसून पाणी निथळून घ्या. रवीने डाळ थोडी घोटून त्यात साखर घालून शिजवत ठेवा. डाळीचं मिश्रण सतत ढवळत राहा. मिश्रण घट्ट होऊन पुरण तयार झाल्यावर आच बंद करा. पुरण थंड झाल्यावर त्यात सुका मेवा आणि वेलदोड्यांची व जायफळ पूड एकत्र करा.
गव्हाच्या पिठात मैदा, थोडं मीठ व तेलाचं मोहन घालून घट्ट भिजवून घ्या आणि थोडा वेळाकरिता झाकून ठेवा. नंतर पिठाच्या लहान पुर्या लाटून त्यात पुरण भरा आणि करंजीप्रमाणे कडा बंद करून कडेला मुरड घाला. तूप गरम करून त्यात हे कडबू खरपूस तळून घ्या.
आम्रखंड
साहित्य : 1 लीटर दूध, दीड वाटी साखर, 1 वाटी आमरस, 1 टीस्पून दही, थोड्या आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी.
कृती : दुधाचं दही आणि दह्याचा चक्का तयार करून घ्या. हा चक्का एका भांड्यात काढून त्यात साखर घालून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण 2 तासांकरिता तसंच ठेवून द्या. नंतर त्यात आमरस घालून सर्व मिश्रण एकत्र पुरण यंत्रातून फिरवा. यामध्ये आंब्याच्या फोडी एकत्र करून साधारण एकत्र करू घ्या. हे मिश्रण तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. श्रीखंड वाढतानाही वरून काही आंब्याच्या फोडी घाला.
टीप : आमरसाच्या गोडीप्रमाणे साखर कमी-जास्त करा.