शेजवान सॉस
साहित्य : 6 टीस्पून कांदा, प्रत्येकी 4 टीस्पून बारीक चिरलेले आले व हिरवी मिरची, 8 टीस्पून बारीक चिरलेली लसूण,
6 टीस्पून बारीक चिरलेली सेलेरी, 4 टीस्पून काश्मिरी मिरचीची पेस्ट, थोडा नारिंगी रंग, 1 टीस्पून मीठ, प्रत्येकी 2 चिमूट अजिनोमोटो व काळी मिरी पूड, पाऊण टीस्पून साखर, दीड कप गार्लिक चिली सॉस, 3 टेबलस्पून टोमॅटो केचप.
कृती : नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यावर कांदा व आले-लसूण परतवून घ्या. त्यात सेलेरी व हिरवी मिरची घालून थोडा वेळ परतवा आणि आच बंद करा. त्यात काश्मिरी मिरचीची पेस्ट, नारिंगी रंग व गार्लिक चिली सॉस (साधारण मिनिटभर) व्यवस्थित एकत्र करा. नंतर हे मिश्रण पुन्हा मंद आचेवर ठेवा. थोडा वेळ परतवून त्यात मीठ, अजिनोमोटो, काळी मिरी पूड, साखर व टोमॅटो केचप घालून शिजवा. आवश्यकता वाटल्यास पाणी घालता येईल. थोडा वेळ परतवून आच बंद करा.
साटे सॉस
साहित्य : 3 टेबलस्पून तेल, 10 सुक्या लाल मिरच्या (पाण्यामध्ये भिजवलेल्या), 2 कांदे (बारीक चिरलेले), 10 बदामांची पेस्ट, 2 लसणाच्या पाकळ्या, 1 लेमन ग्रासची दांडी, 750 ग्रॅम बारीक वाटलेले शेंगदाणे, 2 टेबलस्पून चिंचेचा कोळ, अर्धा लीटर पाणी, 2 टेबलस्पून साखर, 1 टीस्पून मीठ.
कृती : भिजवलेली लाल मिरची, कांदा, बदाम, लसूण व लेमन ग्रास मिक्सरमधून बारीक करून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हे वाटण घालून परतवा. नंतर त्यात चिंचेच्या कोळात थोडे पाणी घातलेले मिश्रण घालून उकळी येऊ द्या. नंतर त्यात शेंगदाणे, साखर व मीठ घालून मंद आचेवर शिजवा. मिश्रण दाट झाल्यावर आच बंद करा.