Close

गुलगुले आणि पुरण पोटली (Gulgule And Puran Potali)

गुलगुले


साहित्य : 2 वाटी चण्याची डाळ, 2 वाटी चिरलेला पिवळा गूळ, 2 वाटी उडदाच्या डाळीचं पीठ, अर्धा वाटी काजू-बदामाचे व खोबर्‍याचे काप, स्वादानुसार वेलदोड्यांची व जायफळ पूड, 4 टीस्पून पिठी साखर, तळण्यासाठी तूप.
कृती : चण्याची डाळ पाणी अधिक घालून कुकरमधून चांगली शिजवून घ्या. डाळ गरम असतानाच चाळणीत ओतून पाणी काढून घ्या. लगेच त्यात गूळ घालून पुरण शिजवून घ्या. पुरण वाटून घ्यायची गरज नाही. पुरण थंड झाल्यावर जरा घोटून घ्या. त्यात वेलदोड्यांची पूड, जायफळ पूड आणि काजू-बदामाचे व खोबर्‍याचे काप घालून एकत्र करा. या मिश्रणाचे पेढ्याएवढे छोटे छोटे गोळे करून ठेवा.
उडदाची डाळ जरा भाजून त्याचं पीठ तयार करून घ्या. त्यात थोडं पाणी घालून एकजीव मिश्रण तयार करा. नंतर त्यात अधिक पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सैलसर कालवून घ्या. पुरणाचे गोळे या पिठात बुडवून गरम तुपात गुलाबी रंगावर तळून घ्या. ही पुरणाची गरमागरम गोड भजी तुपासोबत वाढा.

पुरण पोटली


साहित्य : 2 वाटी शिजवलेलं पुरण, 1 वाटी गव्हाचं पीठ, पाव वाटी मैदा, चिमूटभर मीठ, थोडे तेल, 2 टेबलस्पून तयार रबडी, 2 टीस्पून तूप.
कृती : गव्हाच्या पिठात मैदा, स्वादानुसार मीठ आणि तेल घालून, चांगलं मळून घ्या. हे पीठ अर्धा तास तसंच ठेवा. नंतर तेल लावून पुन्हा चांगलं मळून घ्या.
पिठाच्या लहान आकाराच्या लाट्या तयार करून, लहान पुरी लाटा. त्यात थोडं पुरण भरून पोटलीचा आकार द्या. या पोटल्या मोदक पात्रातून 15 मिनिटं वाफवून घ्या. सर्व्ह करताना, वाटीत पोटली ठेवून त्यावर चमचाभर रबडी घालून, वरून थोडं तूप सोडा.

Share this article