Close

उकडीचे मोदक (Ukadiche Modak)

उकडीचे मोदक


पारीसाठी साहित्य : एक कप तांदळाचे पीठ, एक कप पाणी, अर्धा कप दूध, एक चमचा साखर, पाव चमचा मीठ, दोन चमचे तेल किंवा लोणी.

कृती : दूध, पाणी, साखर, मीठ आणि तेल एकत्र करून उकळी येऊ द्या. आता यात तांदळाचे पीठ घालून झटपट हलवत रहा. उकड पूर्णपणे न शिजवता लगेच झाकून ठेवा. उकड गरम राहण्यासाठी एका मोठ्या भांड्यात थोडेसे गरम पाणी घालून त्यात उकडीचं भांडे ठेवा व झाकण बंद करा. उकडीत गुठळ्या झाल्या तर पुरणयंत्रातून फिरवून घ्या. आता हवी तेवढी उकड घेऊन तेल व पाणी लावून मळा आणि त्याचे तीन चार गोळे बनवा. उकड थंड झाल्यास पारीला कडेने चिरा पडतात म्हणून मोदक होईपर्यंत उकड गरमच राहिली पाहिजे.
सारणासाठी साहित्य ः दोन कप नारळाचा चव (हे प्रमाण नेहमी तांदळाच्या पिठाच्या दुप्पट असावे). एक कप गूळ, अर्धा कप साखर, दोन चमचे भाजलेल्या खसखशीची पूड, थोडासा भाजलेला खवा, वेलची-जायफळ पूड.

कृती : नारळाचा चव थोडा परतून घ्या. यामुळे गुळाला पाणी सुटत नाही आणि सारण खमंग बनते. आता या नारळात गूळ, साखर, खसखस, वेलची-जायफळ पूड व खवा घालून सारण एकजीव करून घ्या.
आता तांदळाच्या उकडीचा गोळा तळहातात घेऊन त्याला खोलगट वाटीप्रमाणे आकार द्या. या पारीला चुण्या घ्या. या चुण्यांमधील अंतर समान असावे. यामुळे मोदक सुबक दिसतात. अंदाजे सारण भरून मोदक तयार करा. पातेल्यात पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या. यावर चाळणी ठेवा. चाळणीत तुपाचा हात लावलेली केळीची पाने ठेवून त्यावर मोदक ठेवा. हे मोदक दहा-बारा मिनिटे वाफवा. केळीच्या पानाऐवजी हळदीचे पान ठेवल्यास मोदकांना वेगळा सुगंध येतो. तसेच बाजारू तुपाऐवजी लोणकढं तूप वापरल्यास मोदक अधिक चांगले बनतात.

टीप : वर देण्यात आलेली उकडीच्या मोदकांची पाककृती पुढील सर्व पाककृतींसाठी प्रातिनिधिक आहे. तेव्हा पुढील मोदकांमध्ये उकड काढण्याची व पारी व मोदक बनविण्याची कृती समान राहील.

Share this article