विश्वामित्री उन्हाळा अंगाची लाहीलाही करतो आहे. त्याच्यापासून दिलासा देणारी थंड हवेची ठिकाणे आपण पसंत करतो. हिल स्टेशन्सवर असलेली वनश्री आणि मोकळ्या वातावरणात गारवा मिळतो. अन् आपण सुखावतो.
महाराष्ट्रातील दोन टोकाला असणार्या 2 थंड हवेच्या ठिकाणांची ही ओळख. ओळख म्हणण्यापेक्षा पुनरावलोकन. कारण ही स्थाने तशी आपल्या परिचयाची आहेत. पैकी एक आहे मुंबईच्या जवळ माथेरान. तर दुसरे आहे विदर्भात, अमरावतीच्या जवळचे चिखलदरा. एक आहे लाल मातीचं, तर दुसरं आहे काळ्या मातीचं.
माथेरान
इंग्रजांनी शोधून काढलेलं मुंबई जवळचं लोकप्रिय थंड हवेचं ठिकाण म्हणून माथेरान सगळ्यांच्या माहितीचं आहे. जुन्या जमान्यात केवळ श्रीमंत लोकांसाठी प्रख्यात असलेलं हे गिरीस्थान हळूहळू मध्यमवर्गीयांंचं होऊन बसलं. एका विशिष्ट कालखंडात माथेरान म्हणजे नवविवाहितांचं मधुचंद्र साजरा करण्याचं आवडतं स्थान होतं. अजूनही काही जोडपी इथे जाणं पसंत करतात.
रमणीय, शुद्ध हवेचं ठिकाण
डोंगरमाथ्यावर पसरलेलं, हिरव्यागार वृक्षराजींनी नटलेलं, लाल मातीनं माखलेलं, पण थंडगार हवेनं शुद्ध केलेलं, अत्यंत रमणीय, गारेगार करणारं हे गिरीस्थान म्हणजे माथेरान. निरनिराळे पॉईंटस् आणि घोडेस्वारी, हाती ओढण्याच्या गाड्या अन् खाद्यपदार्थ हे इथले आकर्षण.
तसे इथे बरेच पॉईंटस् असले तरी पॅनोरामा पॉईंट व सनसेट पॉईंट्स हे लोकांच्या खास आकर्षणाचे आहेत. पॅनोरामा पॉईंट हे सूर्योदय पाहण्याचे टोक आहे. इथे प्रशस्त पठार आहे. चंदेरी, नवरा-नवरी, पेब किल्ला, म्हसमाळ अशा डोंगरांचं विहंगम दृश्य या टोकावरून दिसतं.
आकर्षक पॉईंटस्
हार्ट पॉईंट, पॉर्क्युपाईन पॉईंट, इको पॉईंट, मंकी पॉईंट आणि लुईझा पॉईंट हेही तितकेच आकर्षक आहेत. इको पॉईंटवर जाऊन आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी ऐकण्याची मजा काही औरच आहे. सर्व पॉईंटस्वर घोड्यावर बसून जाता येतं. मात्र पायी चालत त्याची मजा घेणार्यांची संख्या जास्त असते. जवळपास प्रत्येक पॉईंटवर थंड पेये, चहा, खाद्यपदार्थ मिळतात. एकच त्रास असतो तो माकडांचा, सगळीकडे माकडे उनाडत असतात. काहीतरी खायला मिळेल, या आशेपोटी तुमच्या हातातील बॅगांवर डल्ला मारतात. तेव्हा माथेरानमध्ये पॉईंटस्वर फिरताना बॅगा नेऊ नये. संध्याकाळच्या वेळी सर्व हौशी पर्यटक सनसेट पॉईंटवर पोहचतात. अन् सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहून कल्ला करतात. अन् पक्ष्यांचे किलबिलाट ऐकत परतीची वाट धरतात.
या पॉईंटस् व्यतिरिक्त शार्लोट लेक अर्थात् एक तलाव हेही माथेरानचे आकर्षण आहे. पावसाचे पाणी अडविण्यासाठी त्याला बांध घातला आहे. माथेरानला पाणी पुरवठा या तळ्यातून होतो. या तलावाजवळ पिसारनाथ मंदिर आहे. शिवाय संध्याकाळी बाजारात पर्यटक फिरतात. अन् खाद्य पदार्थांचा आस्वाद घेतात.
मिनी ट्रेनचे आकर्षण
माथेरान हे हौशी व व्यावसायिक गिर्यारोहकांचं आवडतं स्थान आहे. इथे चिक्कार पाऊस पडतो. पावसाळ्यामध्ये माथेरान बंद राहत असलं तरी ट्रेकर्स या मोसमात तिथे जाणे पसंत करतात. माथेरानला पोहचविणारी मिनी ट्रेन हे तर इथले खास आकर्षण. या छोट्याशा रेलगाडीतून प्रवास करत माथेरानला पोहचणे म्हणजे इथल्या सहलीचे सार्थक झाल्यासारखे वाटते. नेरळ स्थानकावरून ही छोटी गाडी येणंजाणं करते. रस्तामार्गाने मारुती मोटीरींनी जाणारे बरेच पर्यटक आहेत. पण प्रत्यक्ष माथेरान गावात प्रदुषण टाळण्यासाठी वाहनांना पूर्वीपासून बंदी असल्याने, ही वाहने ज्या तळावर थांबतात, तिथून बरेच चालावे लागते. शिवाय चढण असल्याने दमछाक होते. तसेच घाटमाथ्यावरील हा रस्ता खडबडीत आणि तीव्र वळणावळणांचा असल्याने, त्यातून सराईत वाहन चालक ज्या पद्धतीने मोटारगाड्या चालवतात, ते पाहून छाती दडपते.
चिखलदरा
मुंबईच्या दुसर्या टोकाला आहे चिखलदरा. विदर्भ प्रांतातील थंड हवेचं ठिकाण. हे आहे अमरावती जिल्ह्यात. मध्य रेल्वेवरील बडनेरा स्थानकापासून रस्त्याने, अंदाजे 2 तासांच्या अंतरावर. तर महाराष्ट्राची उप राजधानी नागपूर पासून रस्त्याने 4 तासांच्या अंतरावर. अमरावती-नागपूर व बडनेरा येथून एस.टी. बसेस चिखलदर्यास जातात. सातपुडा पर्वतराजीतील हे थंड हवेचे ठिकाण समुद्रसपाटीपासून 1118 मिटर्स उंचीवर आहे. इथली हवा इतकी थंड की, हिवाळ्यात तापमान 5 डिग्री असते. उन्हाळ्यात उकाडा जाणवत असला तरी तो दिवसा. रात्री मात्र गारेगार वाटते. इथे 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार हॉटेल्स आहेत. शिवाय महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे रिझॉर्ट देखील आहे.
धबधबे, तलाव
डोंगरमाथ्यावर असलेल्या या गिरीस्थानावर विपुल वृक्षसंपदा आहे. अनेक प्रकारची फुले, झुडपे, झाडे आणि पक्षी-प्राणी यांनी परिसर नटला आहे. तलाव आहेत. पावसाळ्यात धबधबे वाहत असतात. इथून हिरव्यागार दर्या आणि डोंगराचे होणारे दर्शन विलोभनीय असते. हुरीकेन पॉईंट, प्रॉस्पेक्ट पॉईंट, देवी पॉईंट येथून हे निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवता येते.
कॉफीचे पीक चिखलदरा पासून आसपास मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. तिथे जाऊन व्याघ्र दर्शन घेता येते. तसेच तेथील जंगलात वाटाड्याच्या मदतीने फिरण्याची मौज आगळीच आहे. गाविलगड, नर्नाळा किल्ला, सीमाडोह तलाव ही ठिकाणे आसपास आहेत.
शिवाय पंडित नेहरु बोटॅनिकल गार्डन आणि ट्रायबल म्युझियम ह्या जागा प्रेक्षणीय आहेत. बोटॅनिकल गार्डन मधील वनस्पतींची लागवड अचंबित करणारी आहे. चिखलदर्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे कॉफीचे पीक निघते. सर्वसाधारणपणे कॉफीची लागवड केरळ, कर्नाटक आणि कूर्ग इथे होते. पण चिखलदरा हे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण आहे, जिथे कॉफी पिकते. थंडगार हवेसाठी प्रसिद्ध असलेले हे गिरीस्थान वेगळे आहे. म्हणूनच आवर्जून भेट देण्याजोगे आहे.